गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

6 Min Read

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठी

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा

नारळी पौर्णिमा संपली कि, वेध लागतात गणेशोत्सवाचे. हिंदू धर्मामध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यात ‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला’ गणेश चतुर्थी असते. या दिवसाकडे सर्व भक्त डोळे लावून वाट पाहत असतात.या दिवशी बुद्धीची देवता असलेले गणराया वाजत गाजत भक्तांच्या घरी विराजमान होतात. दहा दिवस चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडू नये म्हणून भक्तांचे प्रयत्न सुरु असतात. बाप्पाचे आगमन झाल्यावर घरातील संकट, दुःख हे सगळे दूर होणार हा भक्तांचा गणरायांवर विश्वास असतो.

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणेश चतुर्थीची कथा

एकदा पार्वती स्नान करण्यासाठी निघाली पण दारावर कोणी पहारेकरी नसल्याने, तिने आपल्या अंगाच्या मळापासून दहा- बारा वर्षाच्या बालकाची मुर्ती बनवून, मंत्रोउच्चारने ती जिवंत केली. त्या बालकाला माता पार्वतीने, तू गौरीपुत्र असून, तू आता आईचा पहारेकरी असून, आपले काम चोख बजावण्यास सांगितले. त्यावेळी तिथे महादेव आले पण गौरीपुत्राने त्यांना दरवाजावरच आडवले. या गोष्टीचा महादेवाला प्रचंड राग आला. त्यांनी क्रोधीत होऊन गौरीपुत्राचे शीर उडवले. माता पार्वतीला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्यांनी महादेवाला मागणी केली, मला माझा मुलगा परत जिवंत करून दया. महादेवाने आपल्या गणाला पृथ्वीवर पाठवून, जो प्राणी प्रथम दिसेल  त्याचे शीर कापून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणाला हत्ती म्हणजे ‘गज’ दिसला. त्याने त्याचे शिर कापून महादेवाला दिले. ते शिर गौरीपुत्राच्या देहाला जोडून जिवंत केले. यावरूनच गौरीपुत्राचे नाव गजानन पडले. गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. तर महादेव यांच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर त्यामुळे ‘ गणेश ‘ हे नाव ठेवले गेले. हे सर्व चतुर्थीच्या दिवशी घडल्याने गणेश चतुर्थीस गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळून येतो.

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…
श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

गणरायाला मोदकांचा प्रसादच का आवडतो

‘मोदक आणि बाप्पा’ हे समीकरण जगविख्यात आहे. बाप्पाला मोदक का आवडते, याविषयी पुराणात एक अख्यायिका आहे. एकदा अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांनी, शिव- पार्वती आणि गणरायाला जेवणाचे आमंत्रण दिले. ठरलेल्या वेळेनुसार जेवणास सुरुवात झाली. शिव पार्वती सोबत गणराया देखील जेवणास बसले. गणरायाची भूक इतकी विशाल होती कि, सगळे बनवलेले पदार्थ संपले पण गणरायाची भूक काही जाईना. ऋषी पत्नी अनुसया चिन्ताग्रस्त झाली. त्यावेळी तिला  एक कल्पना सुचली, असा एक पदार्थ बनवते कि, ज्यामुळे गणरायाचे पोटही भरेल आणि आनंद हि मिळेल. तिने मोदक बनवून गणरायाला वाढले . मोदक खाऊन गणराया आनंदित झाले. त्यांनी एकवीस ढेकर दिले आणि त्यांचे पोट भरले. ‘मोद’ म्हणजे आनंद तर ‘क’ म्हणजे थोडासा, म्हणूनच मोदक खाऊन मिळणारा थोडासा आनंद म्हणजेच मोदक. या आख्यायिका नुसार गणपतीला २१ मोदकांचा प्रसाद देण्याची प्रथा सुरु झाली.

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखकर्ता दुःखहर्ता आरतीविषयी

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रात सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हटली जाते. हि आरती संत रामदास स्वामी यांनी लिहली. हि आरती लिहण्यामागे देखील एक इतिहास आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले महान संत होते. त्याकाळी रामदास स्वामींना त्यांच्या शिष्याकडून वार्ता कळाली कि, महाराष्ट्रावर अफजलखान हल्ला करणार आहे. राज्यावर आलेले हे विघ्न  दूर करण्यासाठी, रामदासांनी गणरायाचा धावा घेतला. त्यांनी अष्टविनायक मधील पहिला गणपती वक्रतुंड आहे. त्याची आरतीद्वारे स्तुती करून राज्यावरचे संकट दूर करण्याची विनंती केली. आपण आरतीचा एक ना एक शब्द  काळजीपूर्वक वाचला  तर आपल्या लक्षात आरतीचा अर्थ येईल. जसे कि, सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या पहिल्याच ओळीत रामदास स्वामी म्हणत आहे, सुख देणारा आणि दुख हरणारा  वार्ता विघ्नाची आहे. अशाच पध्द्तीने आपल्याला आरतीचा अर्थ लक्षात येईल.

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचे गणेशोत्सव

गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता असून, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशपूजनाने केली जाते. बाप्पांचे दहा दिवस, पाच दिवस तर कुठे दिड दिवसांसाठी आगमन होते. हा उत्सव घरापुरता मर्यादित न राहता सावर्जनिक गणेशोत्सवाचे रूप धरते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी गणेशउत्सव सुरु केला होता. लोकांचे प्रबोधन व्हावे हा त्यामागचा स्प्ष्ट हेतू होता पण आताचे गणेश मंडळांचे वागणे बघून खऱ्या गणेश भक्ताला कुठे तरी त्रास होतो. सगळेच मंडळ हे वाईट आहे असे माझे म्हणणे नाही, पण काही गणेश मंडळ बाप्पांची शिकवण बाजूला ठेवून वर्गणी आणि कर्कश गाण्याच्या तालावर गणेशोत्सव साजरा करण्यास आपली धन्यता मानतात. यावर्षी अशा पद्धतीला आपण फाटा लाऊ आणि शांतता प्रिय वातावरणात बाप्पांचा सोहळा साजरा करूया.

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *